*सांगोला पंचायत समितीत वॉशरुम अभावी महिला वर्गांची कुचंबना* *पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष*
सांगोला (क्रांतीचिराग): सांगोला पंचायत समितीच्या आवारात स्वच्छ आणि सुरक्षित असे महिला वर्गासाठी स्वतंत्र वॉशरूम नसल्या कारणाने येथील महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. परंतु सांगोला पंचायत समितीचे प्रशासन या बाबतीत गांभीर्याने घेत नसल्याचेही ऐकावयास मिळते आहे.
सांगोला पंचायत समितीच्या आवारात प्रवेश केल्यानंतर सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येते आहे. परंतु वॉशरूम अभावी येथील महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत असल्याचे निदर्शनास येत आहे.महिला वर्गासाठी असलेल्या येथील वॉशरूमची दुरुस्ती (डागडुजी) करणे गरजेचे असताना पंचायत समितीचे प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते आहे. महिला वर्गासाठी अन्य एक वॉशरूम बांधलेले आहे. परंतु त्या उपलब्ध वॉशरूमच्या स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. सदरच्या वॉशरूम साठी असलेल्या पाण्याच्या टाकीत पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असून महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगोला पंचायत समितीच्या विविध विभागांमध्ये अनेक महिला कर्मचारी आपले प्रशासकीय कर्तव्य बजावत आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीशी संबंधित असणाऱ्या , फिल्डवर काम करणाऱ्या तसेच गावोगावच्या विविध महिला कर्मचाऱ्यांची कामानिमित्त पंचायत समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात ये-जा आणि वर्दळ असते. पंचायत समितीत काम करणाऱ्या तसेच कामानिमित्त पंचायत समितीत येणाऱ्या महिला वर्गाची वॉशरूम अभावी मोठी गैरसोय आणि कुचंबना होत आहे . तरी पंचायत समिती प्रशासनाने याची दखल घेऊन महिला वर्गाची गैरसोय दूर करावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
Comments
Post a Comment